- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुम्ही पहाटेच्या आकाशात पाहिलं असेल, तर तुम्हाला पूर्वेला एक नवा पाहुणा आलेला दिसला असेल.
C/2023 A3 (त्सुचिंशान-अॅटलास) हा धूमकेतू गेल्या वर्षीच सापडला होता. सध्या तो आणखी प्रखर झाला आहे आणि भारतातूनही दिसतो आहे.
या धूमकेतूचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला सूर्याभोवती एक फेरी करण्यासाठी पृथ्वीवरच्या 80 हजार वर्षांएवढा कालावधी लागतो.
म्हणजे याआधी हा धूमकेतू 80 हजार वर्षांपूर्वी सूर्याजवळ आला असेल, तर तेव्हा इथे पृथ्वीवर आदिमानवाचा वावर होता आणि या धूमकेतूची एक फेरी पूर्ण होईपर्यंत आधुनिक मानवाची अख्खी प्रजाती विकसित झाली.
तसंच यानंतर 80 हजार वर्षांनीच तो पुन्हा आपल्या सूर्याजवळ येणार आहे.
पृथ्वीला दोन महिन्यांसाठी मिळणार दुसरा चिमुकला चंद्र
सुनीता विल्यम्स : अंतराळात वास येतो का? अंतराळवीर काय खातात? स्पेस स्टेशनमध्ये कसे झोपतात?
व्हॉयेजर : 46 वर्षांपासून अंतराळात भ्रमण करणारे पृथ्वीचे दूत, नासाच्या मोहिमेनं आपलं आयुष्य असं बदललं
त्सुचिंशान-अॅटलासच नाही, तर कुठलाही धूमकेतू तसा दुर्मिळ मानला जातो. तसंच पुढचा धूमकेतू कधी येईल याचा निश्चित अंदाज लावता येईलच असं नाही.
त्यामुळे जोवर आकाशात हा पाहुणा दिसतो आहे, तोवर त्याला पाहण्याची संधी सोडू नका. हा धूमकेतू सध्या कुठे दिसतो आहे, तो कसा पाहायचा? धूमकेतू कुठून येतात, जाणून घेऊया.
धूमकेतू म्हणजे काय?
अमेरिकन अंतराळसंस्था नासानं केलेल्या वर्णानानुसार धूमकेतू किंवा कॉमेट हे सौरमाला तयार होत असताना उरलेल्या राडारोड्यातून तयार झाले आहेत.
ते एकप्रकारे अंतराळातले दगड आणि बर्फाच्या मिश्रणानं बनलेले गोळेच आहेत असं म्हणा ना.
धूमकेतू अनेकदा सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात आणि कक्षेत सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांचं शेपूट दिसू लागतं. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूमधील बर्फ वितळून ही शेपटी तयार होते.
काही धूमकेतूंची कक्षा लहान असते, तर काहींची इतकी लांब असते की सूर्याभोवती एक फेरी मारायला त्यांना हजारो वर्षही लागतात. अशा धूमकेतूंना 'लाँग पिरीयड कॉमेट' म्हणतात.
शास्त्रज्ञांच्या मते बहुतांश 'लाँग पीरीयड कॉमेट' आपल्या सूर्याच्या भोवती साधारण 306 अब्ज किलोमीटरवर असलेल्या एका बर्फाळ ढगातून येतात.
सूर्याभोवतीचा हा ढग म्हणजे बर्फाळ तुकड्यांनी बनलेलं एक आवरण किंवा कवच असून त्याला ऊर्ट क्लाऊड असं नाव देण्यात आलं आहे.
हा धूमकेतूही याच ऊर्ट क्लाऊडमध्ये जन्माला आल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.
लहान कक्षा असलेल्या धूमकेतूंविषयी ते पुन्हा कधी पाहता येतील याचं निश्चित भाकित करता येणं सोपं असतं. उदाहरणार्थ हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी येतो तर टेंपल-टटल धूमकेतू दर 33 वर्षांनी येतो.
एखादा धूमकेतू सूर्याजवळ येतो तेव्हा त्याच्यात बदल होत जातात. त्यातलं बर्फ वितळू शकतं, त्यांच्या आकारात बदल होऊ शकतो आणि काही वेळा त्यांची वाटेत एखाद्या खगोलीय वस्तूशी टक्कर होऊ शकते.
त्यामुळेच मुंबईच्या नेहरू प्लॅनेटोरियमचे संचालक अरविंद परांजपे म्हणाले होते की, “धूमकेतूचे अभ्यासक अनेकदा म्हणतात की धूमकेतू हे मांजरासारखे असतात. ते कधी कसे वागतील सांगता येत नाही.”
लंडनच्या रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे उप कार्यकारी संचालक रॉबर्ट मॅसे बीबीसीला माहिती देतात की अंधारात स्पष्ट दिसती असे “प्रखर, तेजस्वी धूमकेतू तसे दुर्मिळ असतात. त्यामुळे एखादा धूमकेतू पाहायला मिळत असेल, साधी दुर्बिण वापरूनही तो दिसत असेल तर पाहण्याची संधी सोडू नका. धूमकेतू हे अत्यंत सुंदर दिसतात.”
धूमकेतू महत्त्वाचे का आहेत?
धूमकेतू आपल्या सूर्यमालिकेच्या सुरुवातीपासूनचे घटक आहेत.
म्हणजे सूर्यमालेच्या निर्मितीविषयीची माहिती धूमकेतूंच्या अभ्यासातून मिळू शकते. त्यातून विश्वाची अनेक रहस्यं उलगडू शकतात.
धूमकेतूंच्या शेपटीचे अवशेष काही वेळा मागे राहतात. पृथ्वी या अवशेषांजवळून जाते, तेव्हा या अवशेषांमुळे उल्कावर्षाव झालेला पाहायला मिळतो.
धूमकेतू एखाद्या ग्रहावर, पृथ्वीवर आदळणार नाही ना, याची माहितीही त्याच्या कक्षेच्या अभ्यासातून मिळते. त्यामुळेच धूमकेतूचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं वैज्ञानिक सांगतात.
6.5 कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या चिक्सुलूब भागात एक महाकाय अशनी कोसळून मोठं विवर तयार झालं जे आजही अस्तित्वात आहे. एका सिद्धांतानुसार या स्फोटामुळे डायनोसॉर्सचा अंत झाला. पृथ्वीवर कोसळलेला तो महाकाय दगड म्हणजे लघुग्रह किंवा धूमकेतू असावा असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे.
तर काहींच्या मते धूमकेतूंमुळेच पृथ्वीवर पाणी पोहोचलं आणि पुढे त्यातून जीवसृष्टीचा जन्म झाला.
त्सुचिंशान-अॅटलास धूमकेतू काय आहे?
जानेवारी 2023 मध्ये चीनच्या त्सुचिंशान इथल्या वेधशाळेला एक नवा धूमकेतू आढळून आला.
पाठोपाठ नासाच्या अॅस्टरॉईड टेरेस्ट्रियल-इंपॅक्ट लास्ट अलर्ट सिस्टिम (ATLAS) म्हणजे पृथ्वीजवळच्या कक्षेत येणार्या लघुग्रह आणि खगोलीय वस्तूंविषयी इशारा देणाऱ्या यंत्रणेच्या दक्षिण आफ्रिकेतील एका वेधशाळेनंही या धूमकेतूची नोंद केली.
त्यामुळेच या धूमकेतूचं पूर्ण नाव C/2023 A3 (त्सुचिंशान-अॅटलास) असं ठेवण्यात आलं. काहीजण या धूमकेतूसाठी ‘कॉमेट A3’ असं सुटसुटीत नावंही वापरत आहेत.
2023 पासूनच खगोलशास्त्रज्ञ या धूमकेतूवर लक्ष ठेवून आहेत, त्याचा अभ्यास करतायत.
28 सप्टेंबर 2024 रोजी हा धूमकेतू सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचला. त्यामुळे साध्या डोळ्यांनी दिसेल एवढा प्रखर झाला आहे आणि आता परतीच्या वाटेवर आहे.
12 ऑक्टोबरला हा धूमकेतू पृथ्वीपासून सर्वांत जवळ – सुमारे 7 कोटी किलोमीटरवर येणाक आहे. त्यावेळी तो आणखी प्रखरपणे दिसण्याची शक्यता आहे.
तसं झालं, तर तो पृथ्वीवरून दिसलेला शतकातला सर्वात तेजस्वी धूमकेतू ठरू शकतो, असा काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
एखाद्या केसाळ पुंजक्यासारखा हा धुमकेतू दिसतो आहे आणि त्याला शेपटीही आहे.
कुठे दिसणार धूमकेतू?
शहरांमध्ये क्षितिजाजवळ उजेड, प्रदूषण आणि उंच इमारतींमुळे धूमकेतू दिसणं कदाचित शक्य होणार नाही. पण तुम्ही एखाद्या मोकळं क्षितिज असलेल्या काळोख्या ठिकाणी असाल तर हा धूमकेतू दिसण्याची शक्यता जास्त आहे.
हा धूमकेतू ऑक्टोबरच्या सुरुवातीला आकाशात पूर्व दिशेला सूर्योदयाच्या सुमारास दिसतो आहे. म्हणजे तो पाहण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठावं लागेल.
सूर्योदयाच्या साधारण तासभर आधी पूर्व क्षितिजावर हा धूमकेतू तुम्हाला पाहता येईल, त्यानंतर उजेड वाढेल तसा तो दिसणार नाही.
ऑक्टोबरच्या मध्यावर हा धूमकेतू सूर्यास्तानंतर, पश्चिम क्षितिजा लगतच्या आकाशात दिसू शकेल.
Twitter पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
Twitter पोस्ट समाप्त
सध्या हा धूमकेतू साध्या डोळ्यांनीही दिसू शकतो, पण संधिप्रकाशामुळे तो पाहता येईलच असं सांगता येत नाही. त्यामुळे किमान एखादी छोटी दुर्बिण वापरून पाहिलं तर धूमकेतू आणखी चांगला दिसू शकतो.
भारतात बंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासारख्या शहरांतही हा धूमकेतू दिसला आहे. काहींनी त्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
धूमकेतूंची प्रखरता वेगानं बदलण्याची शक्यता असल्यानं, हा धूमकेतू कधीपर्यंत साध्या डोळ्यांनी पाहता येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हा धूमकेतू पाहण्याची संधी सोडू नका.
चर्चेतले काही प्रसिद्ध धूमकेतू
- हॅलेचा धूमकेतू - दर 76 वर्षांनी येणारा हा धूमकेतू मानवी इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. हा साध्या डोळ्यांनीही दिसतो. वेगवेगळ्या संस्कृतींनी वेगवेगळ्या काळात त्याची नोंद केल्याचं दिसतं.
- शूमेकर-लेव्ही धूमकेतू - 1994 साली जुलै महिन्यात हा धूमकेतू गुरू ग्रहावर आदळून नष्ट झाला होता.
- हेल-बॉप धूमकेतू - 1997 साली आलेला हा धूमकेतू चर्चेचा विषय ठरलेला होता.
- टेंपल-टटल धूमकेतू - दर 33 वर्षांनी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करणाऱ्या या धूमकेतूच्या मागे राहिलेल्या अवशेषांमुळे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीवर उल्कावर्षाव होतो.
अलीकडच्या काळात दिसलेले लक्षणीय धूमकेतू
2020 साली उत्तर गोलार्धात अनेक ठिकाणी दिसलेल्या निओवाईज धूमकेतूची शेपटीही साध्या डोळ्यांनी दिसू शकत होती.
2022-23 मध्ये C/2022 E3 (ZTF) अर्थात ‘ग्रीन कॉमेट’ च्या फोटोंनी जगभरात लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हा धूमकेतू गुरूजवळ येईपर्यंत माणसाला त्याची चाहूलही लागली नव्हती.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सनं लडाखच्या हानले गावातील हिमालयन चंद्रा टेलिस्कोपने तेव्हा याचे काही फोटो टिपले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)